Menu Close

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा Swami Charitra Saramrut Adhyay 21

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा (Swami Charitra Saramrut Adhyay 21) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.

Swami Charitra Saramrut Adhyay 21

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा Swami Charitra Saramrut Adhyay 21

। श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे । कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाली म्हणती त्या ॥१॥

स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत । करोनी माझे मुख निमित्त । वदले श्रीस्वामीराज ॥२॥

आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा । हा ग्रंथ संपूर्ण करावा । भक्तजनांकारणे ॥३॥

संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनी तत्त्वता । गेले स्वस्थानी यतिराज ॥४॥

शके अठराशे पूर्ण । संवत्सर बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ॥५॥

दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥

षट्चक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदोन । आत्मज्योत निघाली पूर्ण । हृदयामधुनी तेधवा ॥७॥

जवळ होते सेवेकरी । त्यांच्या दुःख झाले अंतरी । शोक करिता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥

अक्कलकोटीचे जन समस्त । दुःखे करून आक्रंदन । तो वृतान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥

असो स्वामींच्या लीला । जना सन्मार्ग दाविला । उद्धरिले जडमुढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥

कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी । पालशेत ग्रामामाझारी । जन्म माझा झालासे ॥११॥

श्रेष्ठ चित्तपावन जातीत । उपनाम असे थोरात । बळवंत पार्वतीसुत । नाम माझे विष्णु असे ॥१२॥

तेथेचि बालपण गेले । आता कोपरलीस येणे केले । उपशिक्षक पद मिळाले । विद्यालयी सांप्रत ॥१३॥

वाणी मारवाडी श्रेष्ठ । नाम ज्यांचे शंकरशेट । त्यांसी स्नेह झाला निकट । आश्रयदाते ते माझे ॥१४॥

त्यांची स्वामीचरणी भक्ती । भावार्थे पूजन करिती । धिंवसा उपजली चित्ती । स्वामीचरित्र श्रवणाची ॥१५॥

ते मजला सांगितले । मी स्वामी गुणानुवाद गाइले । हे स्वामी चरित्र लिहिले । अल्प मतीने अत्यल्प ॥१६॥

शब्द सोपे व्यावहारिक भाषा । प्रत्येक अध्याय लहानसा । आबालवृद्धा समजे असा । लघु ग्रंथ रचिला हा ॥१७॥

प्रथमाध्यायी मंगलाचरण । कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन । आधार स्वामीचरित्रास कोण । हेचि कथन केलेसे ॥१८॥

श्रीगुरु कर्दळीवनातूनी निघाले । स्वामीरुपे प्रगटले । भुवरी प्रख्यात झाले । हे कथन द्वितीयाध्यायी ॥१९॥

तारावया भक्तजनाला । अक्कलकोटी प्रवेश केला । तेथीचा महिमा वर्णिला । तृतीयाध्यायी निश्चये ॥२०॥

स्वामींचा करावया छळ । आले दोन संन्यासी खल । तेचि वृत्त सकल । चवथ्यामाजी वर्णिले ॥२१॥

मल्हारराव राजा बडोद्यासी । त्याने न्यावया स्वामींसी । पाठविले कारभाऱ्यांसी । पाचव्यांत ते कथा ॥२२॥

यशवंतराव सरदार । त्यासी दाविला चमत्कार । तयांचे वृत्त समग्र । सहाव्यात वर्णिले ॥२३॥

विष्णुबुवा ब्रह्मचारी । त्यांची स्वामीचरणांवरी । भक्ती जडली कोण्याप्रकारी । ते सातव्यांत सांगितले ॥२४॥

शंकर नामे एक गृहस्थ । होता ब्रह्मसमंधे ग्रस्त । त्यासी केले दुःखमुक्त । आठव्यात ते कथा ॥२५॥

खर्चोनिया द्रव्य बहुत । त्यांनी बांधिला सुंदर मठ । ते वर्णन समस्त । नवव्यात केलेसे ॥२६॥

चिदंबर दीक्षितांचे वृत्त । वर्णिले दशमाध्यायात । ते ऐकता पुनीत । श्रोते होती सत्यचि ॥२७॥

अकरावा आणि बारावा । तैसाचि अध्याय तेरावा । बाळाप्पाचा इतिहास बरवा । त्यामाजी निरुपिला ॥२८॥

भक्तिमार्ग निरुपण । संकलित केले वर्णन । तो चवदावा अध्याय पूर्ण । सत्तारक भाविका ॥२९॥

बसाप्पा तेली सद़्भक्त । तो कैसा झाला स्वामीभक्त । त्याची कथा गोड बहुत । पंधराव्यात वर्णिली ॥३०॥

हरीभाऊ मराठे गृहस्थ । कैसे झाले स्वामीभक्त । सोळा सतरा यांत निश्चित । वृत्त त्यांचे वर्णिले ॥३१॥

स्वामीसुतांचा कनिष्ठ बंधू । त्यासी लागला भजनछंदू । जे दादाबुवा प्रसिद्धु । अठराव्यात वृत्त त्यांचे ॥३२॥

वासुदेव फडक्यांची गोष्ट । आणि तात्यांचे वृत्त । वर्णिले एकोणविसाव्यांत । सारांशरुपे सत्य पै ॥३३॥

एक गृहस्थ निर्धन । त्यासी आले भाग्य पूर्ण । तेचि केले वर्णन । विसाव्यांत निर्धारे ॥३४॥

स्वामी समाधिस्त झाले । एकविसाव्यांत वर्णिले । ग्रंथप्रयोजन कविवृत्त निवेदिले । पूर्ण केले स्वामीचरित्र ॥३५॥

शके अठराशे एकोणवीस । वसंतऋतू चैत्र मास । गुरुवार वद्य त्रयोदशीस । पूर्ण केला ग्रंथ हा ॥३६॥

बळवंत नामे माझा पिता । पार्वती माता पतिव्रता । वंदोनी त्या उभयंता । ग्रंथ समाप्त केलासे ॥३७॥

स्वामींनी दिधला हा वर । जो भावे वाचील हे चरित्र । त्यासी आयुरारोग्य अपार । संपत्ती, संतति प्राप्त होय ॥३८॥

त्याची वाढो विमल किर्ती । मुखी वसो सरस्वती । भवसागर तरोन अंती । मोक्षपद मिळो त्या ॥३९॥

अंगी सर्वदा विनय असो । वृथाभिमान तो नसो । सर्व विद्यासागर गवसो । भक्तश्रेष्ठा लागूनी ॥४०॥

ज्या कारणे ग्रंथ रचिला । जिही प्रसिद्धीस आणिला । त्यांसी रक्षावे दयाळा । कृपाघना समर्था ॥४१॥

मी केवळ मतिमंद । परी भावे घेतला छंद । कृपाळू तू सच्चिदानंद । पूर्ण केला दयाळुवा ॥४२॥

दोन्ही कर जोडोनी । आता हेचि विनवणी । ग्रंथसंरक्षकांलागोनि । सुखी ठेवी दयाळा ॥४३॥

आता ज्ञानी वाचक असती । त्यांस करु एक विनंती । मी केवळ हीनमति । कवित्व करू नेणेची ॥४४॥

परी माझी ही आर्त उत्तरे । वाचावी ऐकावी आदरे । उबग न मानावा चतुरे । स्वामीचरित्र म्हणोनी ॥४५॥

जयजयाजी परमानंदा । वैकुंठवासी श्रीगोविंदा । भक्ततारका आनंदकंदा । अनामातीता अभेदा ॥४६॥

अरिमर्दना सर्वेशा । विश्वंभरा अविनाशा । पुराणपुरुषा अनंतवेशा । भवपाशा सोडवी ॥४७॥

जयजयाजी कमलासना । कमलावरा कमलनयना । विधिताता कमलवदना । हृदयकमली वसावे ॥४८॥

मत्स्य कूर्म वराह जाण । नृसिंह आणि वामन । परशुराम दशरथनंदन । कृष्ण बौद्ध कलंकी तू ॥४९॥

स्वामीचरित्र सुंदर उद्यान । त्यातील कुसुमे वेचून । सुंदर माळ करोन । आला घेवोनि विष्णु कवि ॥५०॥

आपुल्या कंठी तात्काळ । घालोनि चरणी ठविला भाल । सदोदित याचा प्रतिपाल । करावा बाळ आपुले ॥५१॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । एकविंशोऽध्याय गोड हा ॥५२॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा


Similar Post
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Swami Charitra Saramrut Index
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा Swami Charitra Saramrut Adhyay 20