Menu Close

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा Swami Charitra Saramrut Adhyay 20

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा (Swami Charitra Saramrut Adhyay 20) ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा अध्याय online वाचायला मिळेल.

Swami Charitra Saramrut Adhyay 20

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा Swami Charitra Saramrut Adhyay 20

। श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतितमोध्याय ।

॥ श्री गणेशाय नमः ॥

जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥

लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥

तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥

तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥

तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥

वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥

अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला । उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥

असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥

करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥

फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥

गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥

फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्हा समर्थ आज्ञापिती । गृहस्थाचे सत्वर ॥१२॥

शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥

म्हणे यवन याती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । यातीमध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥

आला मनी ऐसा विचार । तो समर्थांस कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥

इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥

दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन । द्रव्य मिळवाया साधन । त्याजवळी नसे परी ॥१७॥

त्यासी देखोन समर्थ । म्हणती हे उच्छिष्ट घे त्वरीत । तो निःशंक मनांत । पात्रावरी बैसला ॥१८॥

त्यासी बोलले समर्थ । तु मुंबापुरी जाई त्वरीत । सफल होतील मनोरथ । द्रव्यप्राप्ती होईल ॥१९॥

स्वामीवचनी भाव धरिला । तात्काळ मुंबईस आला । उगाच भटको लागला । द्रव्य मिळेल म्हणोनी ॥२०॥

प्रभात समयी एके दिवशी । गृहस्थ निघाला फिरायासी । येऊन एका घरापाशी । स्वस्थ उभा राहिला ॥२१॥

तो घरातून एक वृद्ध बाई । दार उघडोन घाईघाई । बाहेर येवोनिया पाही । गृहस्थ पडला दृष्टीसी ॥२२॥

तिने बोलाविले त्याला । आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिधल्या । नोटा आणून सत्वरी ॥२३॥

गृहस्थ मनी आनंदला । बाईते आशिर्वाद दिधला । द्रव्यलाभ होता आला । शुद्धीवरी सत्वर ॥२४॥

समर्थांचे वचन सत्य । गृहस्था आली प्रचित । वारंवार स्तुती करीत । स्तोत्र गात स्वामींचे ॥२५॥

समर्थांची लीला विचित्र । केवी वंदू शके मी पामर । ज्या वर्णिता थोर थोर । श्रमित जाले कविराज ॥२६॥

कोणी दाता नृपवर । दान कराया भांडार । मोकळे करी परी शक्त्यनुसार । याचक नेती बांधोनी ॥२७॥

षड्रस अन्नाचे ढीग पडले । क्षुधित जन तेथे आले । त्यांनी त्यातून भक्षिले । क्षुधा शांत होई तो ॥२८॥

स्वामीचरित्र भांडारातून । रत्ने घेतली निवडोन । प्रेमादरे माळ करुन । श्रोतयांचे कंठी घातली ॥२९॥

श्री स्वामीचरणसरोजी । विष्णुभ्रमर घाली रुंजी । अत्यादरे चरण पूजी । शंकर स्तोत्र प्रेमे गातसे ॥३०॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा ऐकोत भाविक भक्त । विशंतितमोऽध्याय गोड हा ॥३१॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥

Watch it on YouTube: श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा


Similar Post
श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Swami Charitra Saramrut Index
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा Swami Charitra Saramrut Adhyay 19
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा Swami Charitra Saramrut Adhyay 21