Menu Close

गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा – Gurucharitra Adhyay 45 in Marathi

Gurucharitra Adhyay in Marathi

गुरुचरित्राच्या ४५ व्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 45 in Marathi) नरहरी कवीला गुरूच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान मिळते. हा अध्याय आपल्याला गुरूंचे दैवी स्वरूप आणि त्यांच्या भक्तांबद्दलचे त्यांचे अपार प्रेम आणि करुणा याबद्दल शिकवतो. हा अध्याय आपल्याला गुरूंप्रती समर्पण आणि भक्तीच्या महत्त्वाची आठवण करून देतो.

गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा – Gurucharitra Adhyay 45

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । मागें कथा निरोपिलीसी । नंदीनामा कवि ऐसी । दुसरा आणिक आला म्हणोनि ॥१॥

कवणेंपरी झाला शिष्य । तें सांगावें जी आम्हांस । विस्तार करुनि आदिअंतास । कृपा करुनि दातारा ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारका । सांगों तुतें कथा ऐका । आश्चर्य झालें कवतुका । श्रीगुरुचरित्र अति गोड ॥३॥

गाणगापुरीं असतां गुरु । ख्याती झाली अपरांपरु । लोक येती थोरथोरु । भक्त बहुत जाहले ॥४॥

नंदीनामा कवि होता । कवित्व केलें अपरिमिता । समस्त लोक शिकती अमृता । प्रकाश झाला चहूं राष्‍ट्रीं ॥५॥

ऐसें असतां एके दिवसीं देखा । श्रीगुरुसी नेलें भक्तें एका । आपुले घरीं शोभनदायका । म्हणोनि नेलें आपुले ग्रामा ॥६॥

हिपरगी म्हणिजे ग्रामासी । नेलें आमुचे श्रीगुरुसी । पूजा केली तेथें बहुवसी । समारंभ थोर जाहला ॥७॥

तया ग्रामीं शिवालय एक । नाम ‘कल्लेश्वर’ लिंग ऐक । जागृत स्थान प्रख्यात निक । तेथें एक द्विजवर सेवा करी ॥८॥

तया नाम ‘नरहरी’ । लिंगसेवा बहु करी । आपण असे कवीश्वरी । नित्य करी पांच कवित्वें ॥९॥

कल्लेश्वरावांचूनि । आणिक नाणी कदा वचनीं । एकचित्तें एकमनीं । शिवसेवा करीतसे ॥१०॥

समस्त लोक त्यासी म्हणती । तुझे कवित्वाची असे ख्याति । श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीति । गुरुस्मरण करीं तूं कांहीं ॥११॥

त्यांसी म्हणे तो नर । कल्लेश्वरासी विकिलें जिव्हार । अन्यत्र देव अपार । नरस्तुति मी न करीं ॥१२॥

ऐसें बोलोनियां आपण । गेला देवपूजेकारण । पूजा करितां तत्क्षण । निद्रा आली तया द्विजा ॥१३॥

नित्य पूजा करुनि आपण । कवित्व करी पार्वतीरमणा । ते दिवसीं अपरिमाण । निद्रा आली तया देखा ॥१४॥

निद्रा केली देवळांत । देखता जाहला स्वप्नांत । लिंगावरी श्रीगुरु बैसत । आपण पूजा करीतसे ॥१५॥

लिंग न दिसे श्रीगुरु असे । आपणासी पुसती हर्षें । नरावरी तुझी भक्ति नसे । कां गा आमुतें पूजितोसि ॥१६॥

षोडशोपचारेंसीं आपण । पूजा करी स्थिर मनीं । ऐसें देखोनियां स्वप्न । जागृत झाला तो द्विज ॥१७॥

विस्मय करी आपुले मनीं । म्हणे नरसिंहसरस्वती शिवमुनि । आला असे अवतरोनि । आपण निंदा त्याची केली ॥१८॥

हाचि होय सद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारु । भेट घ्यावी आतां निर्धारु । म्हणूनि आला श्रीगुरुपाशीं ॥१९॥

आला विप्र लोटांगणेंसीं । येऊनि लागला चरणासी । कृपा करीं गा अज्ञानासी । नेणों तुझें स्वरुप आपण ॥२०॥

प्रपंचमाया वेष्टोनि । नोळखें आपण अज्ञानी । तूंचि साक्षात् शिवमुनि । निर्धार जाहला आजि मज ॥२१॥

कल्लेश्वर कर्पूरगौरु । तूंचि होसी जगद्गुरु । माझें मन झालें स्थिरु । तुझे चरणीं विनटलों ॥२२॥

तूंचि विश्वाचा आधारु । शरणागता वज्रपंजरु । चरणकमळ वास भ्रमर । ठाकोनि आलों अमृत घ्यावया ॥२३॥

जवळी असतां निधानु । कां हिंडावें रानोरानु । घरा आलिया कामधेनु । दैन्य काय आम्हांसी ॥२४॥

पूर्वीं समस्त ऋषि देखा । तप करिती सहस्त्र वर्षें निका । तूं न पवसी एकएका । अनेक कष्‍ट करिताति ॥२५॥

न करितां तपानुष्ठान । आम्हां भेटलासि तूं निधान । झाली आमुची मनकामना । कल्लेश्वर लिंग प्रसन्न झालें ॥२६॥

तूंचि संत्य कल्लेश्वरु । ऐसा माझे मनीं निर्धारु । कृपा करीं गा जगद्गुरु । म्हणोनि चरणीं लागला ॥२७॥

श्रीगुरु म्हणती तयासी । नित्य आमुची निंदा करिसी । आजि कैसें तुझे मानसीं । आलासी भक्ति उपजोनि ॥२८॥

विप्र म्हणे स्वामियासी । अज्ञान अंधकार आम्हांसी । कैसे भेटाल परियेसीं । ज्योतिर्मय न होतां ॥२९॥

म्यां कल्लेश्वराची पूजा केली । तेणें पुण्यें आम्हां भेटी लाधली । आजि आम्ही पूजेसी गेलों ते काळीं । लिंगस्थानीं तुम्हांसि देखिलें ॥३०॥

स्वप्नावस्थेंत देखिलें आपण । प्रत्यक्ष भेटले तुझे चरण । स्थिर जाहलें अंतःकरण । मिळवावें शिष्यवर्गांत ॥३१॥

ऐसें विनवोनि द्विजवर । स्तोत्र करीतसे अपार । स्वप्नीं पूजा षोडशोपचार । तैसें कवित्व केलें देखा ॥३२॥

मानसपूजेचें विधान । पूजा व्यक्त केली त्याणें । श्रीगुरु म्हणती तत्क्षण । आम्ही स्वप्नरुप लोकांसी ॥३३॥

प्रत्यक्ष आम्ही असतां देखा । स्वप्नावस्थीं कवित्व ऐका । येणें भक्तें केलें निका । स्वप्नीं भेदूनि समस्त ॥३४॥

ऐसें म्हणोनि शिष्यांसी । वस्त्रें देती त्या कवीसी । लागला तो श्रीगुरुचरणासी । म्हणे आपण शिष्य होईन ॥३५॥

श्रीगुरु म्हणती तयासी । कल्लेश्वर श्रेष्‍ठ आम्हांसी । पूजा करीं गा नित्य त्यासी । आम्ही तेथें सदा वसों ॥३६॥

विप्र म्हणे स्वामियासी । प्रत्यक्ष सांडोनि चरणासी । काय पूजा कल्लेश्वरासी । तेथेंही तुम्हांसी म्यां देखिलें ॥३७॥

तूंचि स्वामी कल्लेश्वरु । त्रयमूर्तीचा अवतारु । हाचि माझा सत्य निर्धारु । न सोडीं आतां तुझे चरण ॥३८॥

ऐसें विनवोनि स्वामियासी । आला सवें गाणगापुरासी । कवित्वें केलीं बहुवसी । सेवा करीत राहिला ॥३९॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । कवीश्वर दोघे श्रीगुरुपाशीं । आले येणें रीतीसीं । भक्ति करिती बहुवस ॥४०॥

म्हणे सरस्वती-गंगाधरु । ज्यासी प्रसन्न होय श्रीगुरु । त्याचे घरीं कल्पतरु । चिंतिलें फळ पाविजे ॥४१॥

कथा कवीश्वराची ऐसी । सिद्ध सांगे नामधारकासी । पुढील कथा विस्तारेंसीं । सांगेल सिद्ध नामधारका ॥४२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे नरहरिकवीश्वर-वरप्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः ॥४५॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ॥ ओंवीसंख्या ४२ ॥

॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥

Watch it on YouTube: गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीसावा


Similar Post
गुरूचरित्र अनुक्रमणिका – Shri Gurucharitra Index
गुरूचरित्र अध्याय चव्वेचाळीसावा – Gurucharitra Adhyay 44 in Marathi
गुरूचरित्र अध्याय सेहेचाळीसावा – Gurucharitra Adhyay 46 in Marathi