Menu Close

गुरूचरित्र अध्याय पंधरावा – Gurucharitra Adhyay 15 in Marathi

Gurucharitra Adhyay in Marathi

गुरुचरित्राच्या १५ व्या अध्यायात (Gurucharitra Adhyay 15 in Marathi) गुरूंच्या कृपेने सर्व दुःख कसे संपतात हे स्पष्ट केले आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की आपण गुरूंच्या चरणी शरण जावे आणि त्यांची दृष्टी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरूंच्या कृपेने आपण जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवून आनंदी जीवन जगू शकतो.

गुरूचरित्र अध्याय पंधरावा – Gurucharitra Adhyay 15

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

ऐक शिष्या नामकरणी । धन्य धन्य तुझी वाणी । तुझी भक्ति गुरुचरणीं । लीन जाहली परियेसा ॥१॥

तूं मातें पुसतोसी । होत मन संतोषी । गौप्य व्हावया कारण कैसी । सांगेन ऐक एकचित्तें ॥२॥

महिमा प्रगट जाहली बहुत । तेणें भजती लोक अमित । काम्यार्थ व्हावे म्हणूनि समस्त । येती श्रीगुरुच्या दर्शना ॥३॥

साधु असाधु धूर्त सकळी । समस्त येती श्रीगुरुजवळी । वर्तमानीं खोटा कळी । सकळही शिष्य होऊं म्हणती ॥४॥

पाहें पां पूर्वी भार्गवराम अवतरोनि । निःक्षत्र केली मेदिनी । राज्य विप्रांसी देउनी । गेला आपण पश्चिमसमुद्रासी ॥५॥

पुनरपि जाती तयापासीं । तोही ठाव मागावयासी । याकारणें विप्रांसी । कांक्षा न सुटे परियेसा ॥६॥

उबगोनि भार्गवराम देखा । गेला सागरा मध्योदका । गौप्यरूपें असे ऐका । आणिक मागतील म्हणोनि ॥७॥

तैसे श्रीगुरुमूर्ति ऐक । राहिले गुप्त कारणिक । वर मागतील सकळिक । नाना याती येवोनियां ॥८॥

विश्वव्यापक जगदीश्वर । तो काय देऊं न शके वर । पाहूनि भक्ति पात्रानुसार । प्रसन्न होय परियेसा ॥९॥

याकारणें तया स्थानीं । श्रीगुरु होते गौप्यगुणीं । शिष्यां सकळांसि बोलावुनी । निरोप देती तीर्थयात्रे ॥१०॥

सकळ शिष्यां बोलावोनि । निरोप देती नृसिंहमुनि । समस्त तीर्थे आचरोनि । यावें भेटी श्रीशैल्या ॥११॥

ऐकोनि श्रीगुरुचे वचना । समस्त शिष्य धरिती चरणा । कृपामूर्ति श्रीगुरुराणा । कां उपेक्षिसी आम्हांसी ॥१२॥

तुमचे दर्शनमात्रेंसी । समस्त तीर्थे आम्हांसी । आम्हीं जावें कवण ठायासी । सोडोनि चरण श्रीगुरुचे ॥१३॥

समस्त तीर्थे श्रीगुरुचरणीं । ऐसें बोलती वेदवाणी । शास्त्रींही तेंचि विवरण । असे स्वामी प्रख्यात ॥१४॥

जवळी असतां निधान । केवीं हिंडावें रानोरान । कल्पवृक्ष सांडून । केवीं जावें देवराया ॥१५॥

श्रीगुरु म्हणती शिष्यांसी । तुम्ही आश्रमी संन्यासी । राहूं नये पांच दिवशीं । एके ठायीं वास करीत ॥१६॥

चतुर्थाश्रम घेऊनि । आचरावीं तीर्थे भुवनीं । तेणें मनीं स्थिर होऊनि । मग रहावें एकस्थानीं ॥१७॥

विशेष वाक्य आमुचें एक । अंगीकारणें धर्म अधिक । तीर्थे हिंडूनि सकळिक । मग यावें आम्हांपाशीं ॥१८॥

‘बहुधान्य’ नाम संवत्सरासी । येऊं आम्ही श्रीशैल्यासी । तेथें आमुचे भेटीसी । यावें तुम्हीं सकळिक हो ॥१९॥

ऐसेंपरी शिष्यांसी । श्रीगुरु सांगती उपदेश । समस्त लागती चरणांस । ऐक शिष्या नामधारका ॥२०॥

शिष्य म्हणती श्रीगुरुस तुमचें वाक्य आम्हां परीस । जाऊं आम्ही भरंवसें । करुं तीर्थे भूमीवरी ॥२१॥

गुरुचें वाक्य जो न करी । तोचि पडे रौरव-घोरीं । त्याचें घर यमपुरीं । अखंड नरक भोगी जाणा ॥२२॥

जावें आम्हीं कवण तीर्था । निरोप द्यावा गुरुनाथा । तुझें वाक्य दृढ चित्ता । धरुनि जाऊं स्वामिया ॥२३॥

जे जे स्थानीं निरोप देसी । जाऊं तेथें भरंवसीं । तुझे वाक्येंचि आम्हांसी । सिद्धि होय स्वामिया ॥२४॥

ऐकोनि शिष्यांचें वचन । श्रीगुरुमूर्ति प्रसन्नवदन । निरोप देती साधारण । तीर्थयात्रे शिष्यांसी ॥२५॥

या ब्रह्मांडगोलकांत । तीर्थराज काशी विख्यात । तेथें तुम्हीं जावें त्वरित । सेवा गंगाभागीरथी ॥२६॥

भागीरथीतटाकयात्रा । साठी योजनें पवित्रा । साठी कृच्छ्र-फळ तत्र । प्रयाग गंगाद्वारीं द्विगुण ॥२७॥

यमुनानदीतटाकेसी । यात्रा वीस गांव परियेसीं । कृच्छ्र तितुकेचि जाणा ऐसी । एकोमनें अवधारा ॥२८॥

सरस्वती म्हणजे गंगा । भूमीवरी असे चांगा । चतुर्विशति गांवें अंगा । स्नान करावें तटाकीं ॥२९॥

तितुकेंचि कृच्छ्रफल त्यासी । यज्ञाचें फल परियेसीं । ब्रह्मलोकीं शाश्वतेसीं । राहे नर पितृसहित ॥३०॥

वरुणानदी कुशावर्ती । शतद्रू विपाशका ख्याती । वितस्ता नदी शरावती । नदी असती मनोहर ॥३१॥

मरुद्‌वृधा नदी थोर । असिक्री मधुमती येर । पयस्वी घृतवतीतीर । तटाकयात्रा तुम्ही करा ॥३२॥

देवनदी म्हणिजे एक । असे ख्याति भूमंडळीक । पंधरा गांवें तटाक । यात्रा तुम्हीं करावी ॥३३॥

जितुके गांव तितके कृच्छ्र । स्नानमात्रें पवित्र । ब्रह्महत्यादि पातकें नाश तत्र । मनोभावें आचरावें ॥३४॥

चंद्रभागा रेवतीसी । शरयू नदी गोमतीसी । वेदिका नदी कौशिकेसी । नित्यजला मंदाकिनी ॥३५॥

सहस्त्रवक्त्रा नदी थोर । पूर्णा पुण्यनदी येर । बाहुदा नदी अरुणा थोर । षोडश गांवें तटाकयात्रा ॥३६॥

जेथें नदीसंगम असती । तेथें स्नानपुण्य अमिती । त्रिवेणीस्नानफळें असतीं । नदीचे संगमीं स्नान करा ॥३७॥

पुष्करतीर्थ वैरोचनि । सन्निहिता नदी म्हणूनि । नदीतीर्थ असे सगुणी । गयातीर्थी स्नान करा ॥३८॥

सेतुबंध रामेश्वरीं । श्रीरंग पद्मनाभ-सरीं । पुरुषोत्तम मनोहरी । नैमिषारण्य तीर्थ असे ॥३९॥

बदरीतीर्थ नारायण । नदी असती अति पुण्य । कुरुक्षेत्रीं करा स्नान । अनंत श्रीशैल्ययात्रेसी ॥४०॥

महालयतीर्थ देखा । पितृप्रीति तर्पणें ऐका । द्विचत्वारि कुळें निका । स्वर्गासी जाती भरंवसीं ॥४१॥

केदारतीर्थ पुष्करतीर्थ । कोटिरुद्र नर्मदातीर्थ । मातृकेश्वर कुब्जतीर्थ । कोकामुखी विशेष असे ॥४२॥

प्रसादतीर्थ विजयतीर्थ । पुरी चंद्रनदीतीर्थ । गोकर्ण शंखकर्ण ख्यात । स्नान बरवें मनोहर ॥४३॥

अयोध्या मथुरा कांचीसी । द्वारावती गयेसी । शालग्रामतीर्थासी । शबलग्राम मुक्तिक्षेत्र ॥४४॥

गोदावरीतटाकेसी । योजनें सहा परियेसीं । तेथील महिमा आहे ऐसी । वांजपेय तितुकें पुण्य ॥४५॥

सव्यअपसव्य वेळ तीनी । तटाकयात्रा मनोनेमीं । स्नान करितां होय ज्ञानी । महापातकी शुद्ध होय ॥४६॥

आणिक दोनी तीर्थे असतीं । प्रयागसमान असे ख्याति । भीमेश्वर तीर्थ म्हणती । वंजरासंगम प्रख्यात ॥४७॥

कुशतर्पण तीर्थ बरवें । तटाकयात्रा द्वादश गांवें । गोदावरी-समुद्रसंगमें । षट्‌त्रिंशत कृच्छ्रफळ ॥४८॥

पूर्णा नदीतटाकेंसी । चारी गांवें आचरा हर्षी । कृष्णावेणीतीरासी । पंधरा गांवें तटाकयात्रा ॥४९॥

तुंगभद्रातीर बरवें । तटाकयात्रा वीस गांवें । पंपासरोवर स्वभावें । अनंतमहिमा परियेसा ॥५०॥

हरिहरक्षेत्र असे ख्याति । समस्त दोष परिहरती । तैसीच असे भीमरथी । दहा गांवें तटाकयात्रा ॥५१॥

पांडुरंग मातुलिंग । क्षेत्र बरवें पुरी गाणग । तीर्थे असती तेथें चांग । अष्टतीर्थे मनोहर ॥५२॥

अमरजासंगमांत । कोटि तीर्थे असतीं ख्यात । वृक्ष असे अश्वत्थ । कल्पवृक्ष तोचि जाणा ॥५३॥

तया अश्वत्थसन्मुखेंसी । नृसिंहतीर्थ परियेसीं । तया उत्तरभागेसी । वाराणसी तीर्थ असे ॥५४॥

तया पूर्वभागेसी । तीर्थ पापविनाशी । तदनंतर कोटितीर्थ विशेष । पुढें रुद्रपादतीर्थ असे ॥५५॥

चक्रतीर्थ असे एक । केशव देवनायक । ते प्रत्यक्ष द्वारावती देख । मन्मथतीर्थ पुढें असे ॥५६॥

कल्लेश्वर देवस्थान । असे तेथें गंधर्वभुवन । ठाव असे अनुपम्य । सिद्धभूमि गाणगापुर ॥५७॥

तेथें जे अनुष्‍ठान करिती । तया इष्‍टार्थ होय त्वरितीं । कल्पवृक्ष आश्रयती । कान नोहे मनकामना ॥५८॥

काकिणीसंगम बरवा । भीमातीर क्षेत्र नांवा । अनंत पुण्य स्वभावा । प्रयागासमान असे देखा ॥५९॥

तुंगभद्रा वरदा नदी । संगमस्थानीं तपोनिधी । मलापहारीसंगमीं आधीं । पापें जातीं शतजन्मांचीं ॥६०॥

निवृत्तिसंगम असे ख्याति । ब्रह्महत्या नाश होती । जावें तुम्हीं त्वरिती । श्रीगुरु म्हणती शिष्यांसी ॥६१॥

सिंहराशीं बृह्स्पति । येतां तीर्थे संतोषती । समस्त तीर्थी भागीरथी । येऊनियां ऐक्य होय ॥६२॥

कन्यागतीं कृष्णेप्रती । त्वरित येते भागीरथी । तुंगभद्रा तुळागतीं । सुरनदीप्रवेश परियेसा ॥६३॥

कर्काटकासी सूर्य येतां । मलप्रहरा कृष्णासंयुता । सर्व जन स्नान करितां । ब्रह्महत्या पापें जातीं ॥६४॥

भीमाकृष्णासंगमेसीं । स्नान करितां परियेसीं । साठ जन्म विप्रवंशीं । उपजे नर परियेसा ॥६५॥

तुंगभद्रासंगमीं देखा । त्याहूनि त्रिगुण अधिका । निवृत्तिसंगमीं ऐका । चतुर्गुण त्याहूनि ॥६६॥

पाताळगंगेचिये स्नानीं । मल्लिकार्जुनदर्शनीं । षड्‌गुण फल तयाहूनि । पुनरावृत्ति त्यासी नाहीं ॥६७॥

लिंगालयीं पुण्य द्विगुण । समुद्रकृष्णासंगमीं अगण्य । कावेरीसंगमीं पंधरा गुण । स्नान करा मनोभावें ॥६८॥

ताम्रपर्णी याचिपरी । पुण्य असंख्य स्नानमात्रीं । कृतमालानदीतीरीं । सर्व पाप परिहरे ॥६९॥

पयस्विनी नदी आणिक । भवनाशिनी अतिविशेष । सर्व पापें हरती ऐक । समुद्रस्कंधदर्शनें ॥७०॥

शेषाद्रिक्षेत्र श्रीरंगनाथ । पद्मनाभ श्रीमदनंत । पूजा करोनि जावें त्वरित । त्रिनामल्लक्षेत्रासी ॥७१॥

समस्त तीर्थांसमान । असे आणिक कुंभकोण । कन्याकुमारी-दर्शन । मत्स्यतीर्थीं स्नान करा ॥७२॥

पक्षितीर्थ असे बरवें । रामेश्वर धनुष्कोटी नावें । कावेरी तीर्थ बरवें । रंगनाथा संनिध ॥७३॥

पुरुषोत्तम चंद्रकुंडेसीं । महालक्ष्मी कोल्हापुरासी । कोटितीर्थ परियेसीं । दक्षिण काशी करवीरस्थान ॥७४॥

महाबळेश्वर तीर्थ बरवें । कृष्णाउगम तेथें पहावें । जेथें असे नगर ‘बहें’ । पुण्यक्षेत्र रामेश्वर ॥७५॥

तयासंनिध असे ठाव । कोल्हग्रामीं नृसिंहदेव । परमात्मा सदाशिव । तोचि असे प्रत्यक्ष ॥७६॥

भिल्लवडी कृष्णातीरीं । शक्ति असे भुवनेश्वरी । तेथें तप करिती जरी । तेचि ईश्वरीं ऐक्यता ॥७७॥

वरुणासंगमीं बरवें । तेथें तुम्ही मनोभावें । स्नान करा मार्कंडेय-नांवें । संगमेश्वरू पूजावा ॥७८॥

ऋषींचे आश्रम । कृष्णातीरीं असती उत्तम । स्नान करितां होय ज्ञान । तयासंनिध कृष्णेपुढें ॥७९॥

पुढें कृष्णाप्रवाहांत । अमरापुर असे ख्यात । पंचगंगासंगमांत । प्रयागाहूनि पुण्य अधिक ॥८०॥

अखिल तीर्थे तया स्थानीं । तप करिती सकळ मुनि । सिद्ध होय त्वरित ज्ञानी । अनुपम क्षेत्र परियेसा ॥८१॥

ऐसें प्रख्यात तया स्थानीं । अनुष्‍ठितां दिवस तीनी । अखिलाभीष्‍ट पावोनि । पावती त्वरित परमार्थी ॥८२॥

जुगालय तीर्थ बरवें । दृष्‍टीं पडतां मुक्त व्हावें । शूर्पालय तीर्थ बरवें । असे पुढें परियेसा ॥८३॥

विश्वामित्रऋषि ख्याति । तप ‘छाया’ भगवती । तेथें समस्त दोष जाती । मलप्रहरासंगमीं ॥८४॥

कपिलऋषि विष्णुमूर्ति । प्रसन्न त्यासि गायत्री । श्वेतशृंगीं प्रख्याति । उत्तरवाहिनी कृष्णा असे ॥८५॥

तया स्थानीं स्नान करितां । काशीहूनि शतगुणिता । एक मंत्र तेथें जपतां । कोटीगुणें फळ असे ॥८६॥

आणिक असे तीर्थ बरवें । केदारेश्वरातें पहावें । पीठापुरीं दत्तात्रेयदेव – । वास असे सनातन ॥८७॥

आणिक असे तीर्थ थोरी । प्रख्यात नामें मणिगिरि । सप्तऋषीं प्रीतिकरीं । तप केलें बहु दिवस ॥८८॥

वृषभाद्रि कल्याण नगरी । तीर्थे असतीं अपरंपारी । नव्हे संसारयेरझारी । तया क्षेत्रा आचरावें ॥८९॥

अहोबळाचें दर्शन । साठी यज्ञ पुण्य जाण । श्रीगिरीचें दर्शन । नव्हे जन्म मागुती ॥९०॥

समस्त तीर्थे भूमीवरी । आचरावीं परिकरी । रजस्वला होतां सरी । स्नान करितां दोष होय ॥९१॥

संक्रांति कर्काटक धरुनि । त्यजावे तुम्हीं मास दोनी । नदीतीरीं वास करिती कोणी । त्यांसी कांहीं दोष नाहीं ॥९२॥

तयांमध्यें विशेष । त्यजावें तुम्हीं तीन दिवस । रजस्वला नदी सुरस । महानदी येणेंपरी ॥९३॥

भागीरथी गौतमीसी । चंद्रभागा सिंधूनदीसी । नर्मदा शरयू परियेसीं । त्यजावें तुम्हीं दिवस तीनी ॥९४॥

ग्रीष्मकाळीं सर्व नदींस । रजस्वला दहा दिवस । वापी-कूट-तटाकांस । एक रात्र वर्जावें ॥९५॥

नवें उदक जया दिवसीं । येतां ओळखा रजस्वलेसी । स्नान करितां महादोषी । येणेंपरी वर्जावें ॥९६॥

साधारण पक्ष तुम्हांसी । सांगितलीं तीर्थे परियेसीं । जें जें पहाल दृष्‍टीसीं । विधिपूर्वक आचरावें ॥९७॥

ऐकोनि श्रीगुरुंचें वचन । शिष्य सकळ करिती नमन । गुरुनिरोप कारण । म्हणोनि निघती सकळिक ॥९८॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । निरोप घेऊनि श्रीगुरुसी । शिष्य गेले यात्रेसी । राहिले श्रीगुरू गौप्यरुपें ॥९९॥

म्हणे सरस्वतीगंगाधर । पुढील कथेचा विस्तार । ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्‍टें साधती ॥१००॥

गुरुचरित्र कामधेनु । श्रोते होवोनि सावधानु । जे ऐकती भक्तजनु । लाधती चारी पुरुषार्थ ॥१॥

ब्रह्मरसाची गोडी । सेवितों आम्हीं घडोघडी । ज्यांसी होय आवडी । साधे त्वरित परमार्थ ॥१०२॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने

सिद्ध-नामधारकसंवादे तीर्थयात्रा निरुपणं नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥

॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ॥ ओंवीसंख्या १०२ ॥

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

Watch it on YouTube: गुरूचरित्र अध्याय पंधरावा


Similar Post
गुरुचरित्र अनुक्रमणिका – Guru Charitra Index
गुरूचरित्र अध्याय चौदावा – Gurucharitra Adhyay 14 in Marathi
गुरूचरित्र अध्याय सोळावा – Gurucharitra Adhyay 16 in Marathi