वाघाडी/शिरपूर: ताज्या बातमी वरून कळलंय की आज सकाळीच शिरपूर जवळ असलेल्या वाघाडी गावातल्या रसायन कंपनीत भीषण स्फोट झालाय. स्फोटाचे नक्की कारण अजून कळू शकलेले नाही मात्र बचावकार्य जोरात सुरु आहे. जखमींना शिरपूर आणि धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कंपनीत अजून ७० लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजून स्फोट होण्याच्या शक्यतेने बचावकार्य काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र आता बचावकार्याला पुन्हा सुरुवात झाली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार स्फोटात २० जण मृत्युमुखी तर ५० पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचे समजते. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी हळहळ व्यक्त केली असून मृत लोकांसाठी ५ लाखाची मदत जाहीर केल्याचे कळते. घातपाताची शक्यता लक्ष्यात घेता ATS चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
तालुक्याचे आमदार मा. काशीराम पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. आवश्यक ती मदत पुरवण्याचे शर्थीचे प्रयत्न घटनास्थळी सुरु आहेत. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की आसपासची खेडी सुद्धा आवाजाने आणि धक्क्याने हादरली. सुरक्षेची खात्री म्हणून सर्वात जवळ असलेले वाघाडी गाव खाली करण्यात आले असून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.